'चंगळवाद आणि ग्राहक'
विषयाला सुरुवात करण्यापूर्वी हे जाणून घेणे गरजेचे आहे, की चंगळवाद म्हणजे काय? तर, सर्वसामान्य जनांसाठी चंगळवाद म्हणजे बेसुमार खरेदी, उधळपट्टी; आणि कर्जबाजारीपणा असा एक नकारार्थी अर्थ. चंगळवादाचे मूळ हे जागतिकीकरणात सापडते. जागतिकीकरणामुळे उत्पादन वाढले व बाजारीकरणास चालना मिळून ग्राहकांना निवडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले व त्यामुळे चंगळवाद वाढीस लागला. निवडीसाठी इतके पर्याय समोर असतात की, ग्राहकांना किती खरेदी करावी व कुठे थांबावे हेच कळत नाही. खरेदीच्या मोह मायेत ते गुरफटतच जातात.
चंगळवाद हा 'जळू' प्रमाणे आहे, ज्याप्रमाणे जळू शरीराला चिकटल्यावर कळतही नाही व तो आपले रक्त शोषतो, त्याचप्रमाणे आपण मानव चंगळवादी कधी झालो हे कळालेच नाही. आपण त्याच्या गर्तेत खोलवर जात राहिलो. मानवाचे स्वतःवर नियंत्रण राहिले नाही व त्याची विवेकबुद्धी यामुळे काम करेनाशी झाली आहे. जागतिकीकरण व परिणामतः चंगळवावामुळे व्यक्तिवाद वाढत चालला आहे. व्यक्तिवाद म्हणजे केवळ स्वतःपुरता विचार करणे व इतरांशी आपले काही घेणे-देणे नाही असे स्वैराचारी वागणे.
बरं, या चंगळवावाने आताच्या आधुनिक युगातच डोके वर काढले असे नाही. अगदी प्राचीन काळातही हा अस्तित्वात होता. सिकंदर, कंस, दुर्योधन हे ह्याचेच उदाहरण होते. आपण सिकंदराचेच उदाहरण घेऊ; स्वतःचे राज्य असूनही जग जिंकण्याचा त्याचा मानस होता. त्यात तो बहुतांशी यशस्वीही झाला मात्र मायदेशी परतताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. बघा, एवढा खटाटोप करून काही साध्य झाले? जगज्जेता म्हणून त्याचे नाव अजरामर झाले, मात्र शेवटी जाताना मात्र यातले तो काहीतरी सोबत घेऊन गेला का? तर नाही. त्याचप्रमाणे आधुनिक युगात ग्राहकांचे झाले आहे. ते भरमसाठ खरेदी करतात. पण खरंच याचा उपयोग आपल्याला होणार आहे का ?
आज शॉपिंग मॉल्सची संख्या इतकी वाढली आहे, की जणू काही 'भू-छत्र्या'च उगवाव्यात. एकाच छताखाली सर्व काही येथे मिळते. पूर्वीसारखे वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरजच नाही. जीवनावश्यक ते चैनीच्या वस्तूंपर्यंत सर्वकाही मिळते. मात्र ही सोय आपल्या 'बजेट'ला चांगलीच मोठ्ठी कात्री लावते. कारण आपण घ्यायला जातो 'एक' वस्तू, मात्र मॉलमधील वस्तूंच्या मायाजालात अडकून त्या एकावर शून्य लागतो व आपण 'दहा' वस्तू घेऊन येतो. त्यावेळी एक क्षणभर आपण विचार करावा की, खरंच आपल्याला या वस्तूंची गरज आहे का? वस्तू केवळ आवडली म्हणून आपण घेतो; मग भलेही 'नव्याचे नऊ दिवस' संपल्यावर ती अडगळीत का पडून राहेना! कधी-कधीतर केवळ करमत नाही म्हणून आपण गाडीला किक मारली की निघतो मॉलला. अगदी 'मस्तमौला' प्रकारचे जीवन झाले आहे आपले. पूर्वीच्या काळी खरेदी ही फक्त काही निमित्तानेच व्हायची उदा. लग्नसोहळा, दसरा-दिवाळी; नागपंचमी इ. पण आता तसे राहिले नाही. उलट खरेदी न करण्यासाठी निमित्त लागते।
सध्याच्या काळात 'स्पर्धा' ही तीव्र होत आहे. मग ती कोणत्याही क्षेत्रात असो. स्पर्धा ही विधायक कारणांसाठी कधीही चांगली. मात्र सध्या ती दिसते ते इतरांची बरोबरी करण्यात! हे अत्यंत खेदजनक आहे. 'जे शेजारी ते आपल्या दारी' या प्रवृत्तीमुळेही चंगळवाद वाढत आहे. त्याने एक हजाराची खरेदी केली; मी दोन हजारांची करेल! असे आपले काम झाले आहे. कुठल्याही गोष्टीचे प्रदर्शन मांडण्याची सवय झाली आहे आपल्याला. 'दिल में आएं भजिएं खाएं' ही वृत्ती सर्वत्रच दिसते. त्यातच 'क्रेडिट कार्ड' ने भर घातली आहे. त्यामुळे ऐपत नसतानाही अमर्याद खरेदी केली जाते. त्याचे बिल EMI स्वरूपात भरण्याची सोय असते. आत्र अशा अनेक वस्तूंचे EMI भरताभरता नाकी नऊ येतात व महिन्याचा पगार हे हफ्ते भरताना संपून जातो. वरकरणी हे सोयीचे वाटत असले तरी यामुळे व्यक्ती कर्जबाजारी होत आहेत.
तुलनात्मक वृत्तीही चंगळवादाला प्रोत्साहन देते. आणि ही तुलना बहुतेकवेळी अवास्तव, अवाजवी असते. हे केवळ खरेदीच्याच नाही तर आरोग्य, शिक्षण अशा सेवांमध्येही दिसून येते. शिक्षण क्षेत्राचे उदाहरण बघितल्यास आज जवळपास प्रत्येक पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यम / CBSE बोर्डाच्या शाळेत प्रवेश देण्यासाठी इच्छुक असतात. या शाळा खासगी तत्त्वावर चालवल्या जातात व त्यांची फी भरणे हे एखादया मध्यमवर्गीय पालकासाठी एखादा हत्ती पोसण्यासारखे असते. पण एवढा अट्टाहास कशासाठी? खरं तर मराठी माध्यमाच्या शाळा या वाईट नाहीतच. वाजवी शुल्कात उत्तम शिक्षण हे नैतिक व जीवनमुल्यांसह पाल्याला प्राप्त होऊ शकते. मात्र आपण फक्त दिखावा करण्यात जातो, की 'माझा मुलगा/ मुलगी अमुक एका इंटरनॅशनल शाळेत शिकतो / शिकते.' हे सांगताना पालकांचा उर भरून येतो मात्र वास्तव काय हे देवच जाणे!
"विकतचे ते चांगले' ही मानसिकता चंगळवाद वाढवते. समजा घरी आपणाला हळदीचे दूध, बासुंदी वा मसला दूध दिल्यास आपण नाक मुरडतो. पण हद्द म्हणून, तेच दूध आपण बाहेर उघड्यावर लागणाऱ्या स्टॉलवर मिटक्या मारत पितो. केवढी मोठी शोकांतिका आहे ही! यात हॉटेल्स, बेकऱ्यांनी भर घातली आहे.
आधी लोक भविष्याचा विचार जास्त करायचे. मात्र सध्याची पिढी फक्त वर्तमानात जगते. 'आज'जगून घेताना भविष्याबद्दल विचारच केला जात नाही. बचत तर स्वप्नवत झाली आहे.
पण, हे सर्व झाले ते वैयक्तिक पातळीवर. पण चंगळवादाचा समाजावरील परिणाम पाहिला तर वाढती गुन्हेगारी याचाच परिपाक आहे. 'अमुक कारणासाठी पैसे न दिल्याने जीव घेतला' अशा आशयाच्या बातम्या रोज वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. त्यामुळे एक सुजाण ग्राहक, नागरिक म्हणून आपण चंगळवादास अटकाव केला पाहिजे. याचा अर्थ मानवाने ऐहिक सुख मिळवूच नये, असा होत नाही. व्यक्ती ही 'चोखंदळ' असावी पण 'चंगळवादी' नसावी.
आज याबाबतीत बरीच जागृकता निर्माण होत आहे. चंगळवाद रोखण्यासाठी काही सकारात्मक पाऊलेही ग्राहक उचलत आहेत. आणि हे सर्व प्रयत्न ग्राहकांनाच करावे लागतील. त्यामुळे मला म्हणावे वाटेल की,
"करण्यासाठी आयुष्याची सोने-चांदी, होऊ नको मानवा तू चंगळवादी !"
▬▬▬۩۞۩▬▬▬
बक्षीस वितरणाचे फोटो. 🙏
🎸 मनोगत व्यक्त करताना 🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा